मूलबाळ होत नसल्याने पत्नीची हत्या व फास घेऊन केली आत्महत्या.
इस्लापूर येथून जवळच असलेल्या भिसी या गावात पत्नीला मुलबाळ होत नसल्यामुळे तोंडावर उशी दाबून पतीने पत्नीला ठार मारले. त्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दि. २० रोजी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भिसी येथील मारोती भालेराव (वय ३५) व पत्नी रूपाली मारोती भालेराव (वय २९) यांना मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सतत वाद होत होते. मंगळवारी दि.१९ सप्टेंबर रोजी याच कारणावरून त्यांच्या वाद झाला. मंगळवारी रात्री मारोती याने रागाच्या भरात पत्नीच्या तोंडावर उशी दाबून धरल्याने गुदमरून पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर मारोती याने सुद्धा नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दि. २० रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केले. डॉ. संदीप खुपसे, डॉ. शिंदे, व आरोग्य कर्मचारी कृष्णा जाधव यांनी शवविच्छेदन केले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राम कृष्ण मळघने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
अशोक जोगदंड रा. मुखेड यांच्या फिर्यादीवरून इस्लापूर पोलिसांनी अनुसया भालेराव, दत्ता भालेराव, कु. सुहासिनी भालेराव यांच्यावर भा. दं. वि. च्या ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांनी पुढील तपास करत आहेत.