
🔴संविधानातील हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू – प्रा. डॉ. गौरव जेवळीकर.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी
देगलूर | भारतीय संविधान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा आचारग्रंथ व्हावा. केवळ अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षतांमध्ये देखील भारतीय संविधानाविषयी अज्ञान आहे. संविधानातील विविध कलमांविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाला संविधानातील अधिकार व कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. गौरव जेवळीकर यांनी व्यक्त केले. ते देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व द फोरम ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन : प्रोफेसर्स एडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर्स & स्कॉलर्स यांच्या एम ओ यू अंतर्गत आयोजित ‘भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य चिद्रावार, तुळजापूर येथील तहसीलदार अरविंद बोळंगे, लोक प्रशासन विभाग प्रमुख डॉ. बालाजी कत्तुरवार, डॉ. संजय देबडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. जेवळीकर म्हणाले, भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य केवळ पाठ करून चालणार नाहीत तर ती समजून घेऊन दैनंदिन जीवनात व प्रत्येक व्यवहारात, आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ‘हा देश व देशातील सार्वजनिक संपत्ती माझा आहे’ या कर्तव्य भावनेतून कार्यप्रवण व्हावे, अशी भावना व्यक्त केली. संविधानातील ११ मूलभूत कर्तव्यांचा आढावा घेताना अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी १९७५ साली भारत सरकारच्या वतीने लादण्यात आलेल्या आणीबाणीचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. खताळ म्हणाले, महाविद्यालयात लोकप्रशासन विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी तसेच नवनवीन विषय सखोल समजून घ्यावेत, हीच कार्यक्रमाच्या आयोजनामाची मुख्य भूमिका आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय देबडे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. बालाजी कत्तुरवार यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा ताटे व विद्या बोईनवाड यांनी तर आभार वैष्णवी वाघधरे यांनी मानले. यावेळी महा विद्यालयातील सर्व विद्या शाखेतील पदवी प्रथम वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.















