*तक्रारीचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी आता प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण दिन – मीनल करनवाल*
नांदेड: नागरिकांना थेट संवाद साधता यावा तसेच तक्रारीचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी आता प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
भोकर पंचायत समिती येथे १३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पहिल्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तक्रार निवारण दिन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात घेण्यात येणार आहे.
तक्रार निवारण दिनातून सकारात्मक फायदा होण्याची शक्यता असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केले. यानिमित्त नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येणार आहेत. यामुळे नागरिकांचा जिल्हा परिषदेला आले येण्याचा वेळ वाचणार आहे. आता तालुका स्तरावरच दर महिन्याला तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येईल. येथे नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यात येतील व त्याचा निपटारा करण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
भोकर येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे. भोकर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपले काही निवेदन व तक्रारी असतील तर १३ सप्टेंबर रोजी भोकर पंचायत समिती येथे अर्जासह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.