11.7 C
New York
Thursday, October 29, 2026

Buy now

spot_img
spot_img

कवयित्री उज्ज्वला पडलवार यांच्या ‘विद्रोह प्रेमाचा’ काव्यसंग्रहाचे भव्य स्वागत

🔴 कवयित्री उज्ज्वला पडलवार यांच्या ‘विद्रोह प्रेमाचा’ काव्यसंग्रहाचे भव्य स्वागत

शिवगर्जना न्यूज : नांदेड प्रतिनिधी

नांदेड : कवयित्री उज्ज्वला पडलवार यांच्या ‘विद्रोह प्रेमाचा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने कवयित्री उज्ज्वला पडलवार यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या साहित्यिक कार्याचे यावेळी मान्यवरांनी कौतुक करत पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रेम हा केवळ भावनेचा विषय नसून तो मानवी जगण्याशी आणि सामाजिक वास्तवाशी जोडलेला व्यापक अनुभव आहे. पुरुषप्रधान चौकटींना छेद देत कवयित्री उज्ज्वला पडलवार यांच्या कवितेतून स्त्रीच्या अस्मितेचा बुलंद स्वर उमटतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रवीण पाटील होते. यावेळी कवी शिवाजी अंबुलगेकर व काँ. विजय गामणे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कदम यांनी पडलवार यांच्या कविता आत्मसमर्पण करणाऱ्या नसून स्वतःचा शोध घेणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध प्रश्न उपस्थित करणाऱ्या असल्याचे सांगितले.

डॉ. प्रवीण पाटील यांनीही बदलती जातपात व्यवस्था आणि शोषितांच्या प्रश्नांवर या काव्यसंग्रहातून संवेदनशील भाष्य झाल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभीदा प्रकाशनच्या प्रा. डॉ. विजया दाढेल यांनी केले. सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले, तर आभार डॉ. भगवान सूर्यवंशी यांनी मानले. या सोहळ्यास नांदेड मधील साहित्यिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कवयित्री उज्ज्वला पडलवार यांचा विशेष सत्कार

राष्ट्रीय कलाल, गौड समाज युवा संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील अनंतवार यांच्या पुढाकाराने कवयित्री उज्ज्वला पडलवार यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सुनील अनंतवार म्हणाले की, ‘विद्रोह प्रेमाचा’ हा केवळ कवितासंग्रह नसून प्रेम, स्त्री-अस्मिता, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि मानवी संवेदनांना शब्द देणारा साहित्यिक आवाज आहे. आपल्या समाजातील प्रतिभावंत आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देणे ही सामूहिक जबाबदारी आहे. उज्ज्वला पडलवार यांनी आपल्या लेखणीतून समाजाच्या जिवंत प्रश्नांना भिडण्याचे धाडस केले असून त्यांच्या साहित्यिक योगदानाचा निश्चितच अभिमान आहे.

त्यांच्या लेखणीतून व्यक्त होणाऱ्या संवेदना आणि विद्रोही विचारांना समाजाने वाचले, समजून घेतले आणि पुढे नेले पाहिजे. ‘विद्रोह प्रेमाचा’ या काव्यसंग्रहाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळेल आणि उज्ज्वला पडलवार यांची साहित्यिक वाटचाल अधिक समृद्ध होईल, असा विश्वासही सुनील अनंतवार यांनी व्यक्त केला.

यावेळी अखिल भारतीय कलवार, कलाल, कलार समिती नांदेड प्रभारी बाबाराव नंदेवार, जिल्हा परिषद शाखा अभियंता रमेश कडेमवार, ओबीसी नेते दत्तात्रय अनंतवार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा प्रबंधक अशोक पडलवार, समाज संघटनेचे नांदेड जिल्हा सचिव गंगाधर नंदेवाड, सामाजिक कार्यकर्ते शेषेराव अनंतवार, मुदखेड माजी नगरसेवक कैलास गोडसे, कर सल्लागार शंकर रायपलवार, ज्ञानेश्वर इबितवार, सुरेश अनंतवार, अविनाश घंटलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून कवयित्री उज्ज्वला पडलवार यांच्या साहित्यिक कार्याला कौतुकाची आणि प्रोत्साहनाची दाद मिळाली.

मुख्य संपादक : श्री. शहाजी वरखिंडे

मो. 9923072242

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या