दुःखातला विठ्ठल भक्त
शिवगर्जना न्यूज,
कोणी मारले काठीन
कोणी उभारला हात
मळा भक्तीचा चोख्याने
फुलविला काळजात
• देव उभा देवळात
चोखा जळे अंधारात
वेदनेच्या वादळात
चमकतो अभंगात
• उभा घामाने भिजतो चोखा भक्तीमध्ये दंग
नामजप सदा ओठी
भुलविला पांडुरंग
• रक्त सर्वांचेच लाल
झाले चोखोबाचे हाल वाटेवरचा धुराळा
झाला अबीर गुलाल
• भक्तीरसात भिजून
ओळी अभंगाच्या आल्या
सारं काळीज फाटलं चिंध्या आयुष्याच्या झाल्या
• देह चेंगरून मेला
दगडांच्या ढिगार्यात
दिवा दुःखाने जळतो विठ्ठलाच्या गाभाऱ्यात
• चोखा प्रांजळ पवित्र
दुःख सोसत राहिला
नामा जप विठ्ठलाचा हाडातून ऐकू आला
• त्याला छळले लोकांनी
त्याची पाहुनिया जातं
समतेची वाट जाते ममतेचा अंगणात
स्वाती भास्कर बंगाळे ✍️