
🔴 दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या रा.से.यो. विशेष शिबीराचा मौजे नारवट येथे समारोप संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
भोकर : प्रतिनिधी
भोकर : दि. १८ जाने. २०२५ येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या १२ जानेवारी पासून चालू झालेल्या विशेष वार्षिक शिबीराचा तालुक्यातील मौजे नारवट येथे दि.१८ जानेवारी रोजी समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण, प्रमुख पाहुणे डॉ. रघुनाथ शेटे, सरपंच श्री. रामदास जोंधळे, उपसरपंच श्री. नागोराव झाडे, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष श्री. सदाशिव डोखळे, पोलीस पाटील श्री. देविदास काळेवार, सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री.गजानन कुमरे, सौ. सुमनबाई खूपसे, श्री. नारायण कुमरे आणि श्री.गौतम लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे डॉ. रघुनाथ शेटे यांनी शिबीरार्थींना संबोधित करताना रासेयो स्वयंसेवकांनी गावकऱ्यांच्या साथीने श्रम दानातून केलेली ग्राम स्वच्छता, गावा जवळील ओढ्यावर तयार केलेला वनराई बंधारा, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात घेतलेले जनावरांचे लसीकरण शिबीर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात घेतलेले आरोग्य व रक्त तपासणी शिबीर, गावातील जिल्हा परिषद शाळेला ग्रंथ भेट, वृक्षारोपण, रक्तदान, आणि डिजिटल साक्षरता विषयी जनजागृती अशा विविध उपक्रमांचा आढावा घेत अशा प्रकारच्या शिबीरांमधून युवकांचे मन, मस्तिष्क आणि मनगट बळकट होते असे प्रतिपादन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पंजाब चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना, श्रम प्रतिष्ठा, सामाजिक समायोजन इत्यादी मूल्ये रुजविण्याचे रासेयो शिबीर एक व्यासपीठ आहे असे अधोरेखित केले. सरपंच श्री. रामदास जोंधळे यांनी आपल्या मनोगतात स्वयंसेवकांनी आपल्या गावात चालू असलेल्या सुंदर गावाच्या कामात नवी ऊर्जा भरल्याची भावना व्यक्त केली. या बरोबरच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एस. पांचाळ, आणि माधवराव लोखंडे, नारायण कुमरे, गौतम लोखंडे या गावकऱ्यांनीही आपले मनोगत मांडले. स्वयंसेवकांनी प्रातिनिधिक स्वरूपात या शिबीराच्या माध्यमातून आलेले अनुभव कथन केले.
महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी धम्मदीप ढोले याने शिबीराचे अहवाल वाचन केले, तर वैष्णवी राठोड हिने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत टाके यांनी आभार प्रदर्शन केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. हनुमंत जवळगे, डॉ. संजय काळे, सर्व स्वयंसेवक, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी आणि नारवटच्या गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















