25.9 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️कविता

शिवगर्जना न्यूज, 9923072242

▪️कविता▪️

तुझे डोळे गुलाबी का

होतात रडल्यावर 

खळी गालात पडते का 

हसू ओठात आल्यावर 

तुझ्या केसात फुलणाऱ्या 

फुलांचा वास दरवळतो

हातात काकणांचा 

आवाज खळखळतो 

तुझ्या नाजूक पायांची 

पैंजणी बोलती रुणझुण 

तो चंद्र लाजतो बघ 

तुला स्वप्नातही पाहून 

तुझ्या हृदयात आहे मी 

मला ठाऊक आहे ते 

कसे शब्दात सांगू मी 

किती मी प्रेम करतो ते 

नको तो शौक दारूचा

नशा प्रेमाची चढल्यावर 

मला विसरून गेलो मी 

तुझ्या प्रेमात पडल्यावर 

       (- स्वाती भास्कर बंगाळे  ) 

******************************

▪️स्वतंत्र माझा भारत देश▪️ 

मला प्रिय आहे स्वतंत्र माझा भारत देश

रंगीबेरंगी झेंड्यांखाली होतात

हिंसक जातीय दंगली

नष्ट होतायत जंगल अन्

माणसं होतात जंगली

मानवतेला काळीमा फासतात

विषमता भ्रष्टाचार धर्मांधता

अंधश्रध्दा अशा असंख्य किडींनी

घायाळ झालेल्या भारतमातेला

आधुनिक डिजिटल इंडियाच्या

स्वप्नांची करतो मलमपट्टी

दारिद्र पांघरून सडते दुर्लक्षित

झोपडपट्टी

नीतिभ्रष्ट लुटारूंच्या आलेशान इमारती

भाग्यवान असतात म्हणे त्यांची कुलूंगी कुत्रीही

गरीब रडतोय अन् श्रिमंत सोन्यानं मढतोय

विषमतेची वाढते दरी अन् व्यवस्था आजारी

सर्वस्पर्शी समता प्रस्थापित करा

सुखी समाजाची पायाभरणी करायची

विश्वप्रेम देशभक्तीची विचारधारा

काळजाच्या कोपय्रा कोपय्रात पेरायची

कारण मला प्रिय आहे माझा स्वतंत्र भारत देश

सत्तांध नराधम लुटतात विकतीलही

भारतमातेला जनतेला गाजर दाखवून

शेतकय्रांचे संप आरक्षणाचा मोर्चा

विकृतीच्या वणव्याची घराघरात चर्चा

नोटांचे रंग बदलणारांनो

मला भिती वाटते राष्ट्रध्वजाचा

रंगही बदलेल काय याची

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली

भारतमाता पुन्हा एकदा गुलाम होईल

लुटतील करतील अत्याचार परकीय देणेकरी

अन् स्वातंत्र हलाल होईल

आजचे सत्तांध करतील परकीयांपुढे

चमचेगीरी लाळघोटेपणा स्वार्थासाठी

अन् करावं लागेल स्वातंत्र्ययुध्द

घायाळ होवून तळमळणाय्रा मायभूमीसाठी

तिरंग्यासाठी खायची गोळी

राबणारा श्रमीक देशभक्त

लावतो मातीचं कपाळी

देशाचं नाव प्रत्येकाच्या पेशी पेशीवर

कोरायचं

देशासाठी जीवाचं रान करायचं

कारण मला प्रिय आहे स्वतंत्र माझा भारत देश

अंकूरणाय्रा बियांवर अन् स्वप्नांवर ही होतात बलात्कार

होतात उगवत्या चांदण्याचे गर्भपात

कोवळ्या वयात

रक्ताळलेलं ठसठसणारं आभाळ

हिंसक द्वेष पेरतं काळजात

फॅशनचं फॅड अन् डोक्यांत याड घेवून

उघडी नागडी फिरणारी तरूणाई

वाढणारे टॅक्स अन् जीवघेणी महागाई

इथं प्रत्येकजन लढतोय लुटतोय

स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी झटतोय

व्देष हिंसा वासनांधता भ्रष्टाचार अशा विकृतींच्या वाळवीला लावायची आहे आग

देशहितासाठीचं फुलवायची विकासाची बाग

ज्ञानाचं अन् प्रेमाचं सिंचन करून

प्रत्येकाच्या काळजात संस्काराचं

बियानं पेरायचं

बाळस धरायला लागलेला विकास आणि रांगणाय्रा योजना

किती दिवस कल्पनेतचं रंगवायचा आदर्श देश

कर्म ज्ञान अन् भक्ती या तीन दगडाच्या चुलीवरचं भाजायची देशाची भाकरी

नवविचारांचे पक्वांन्न साहित्याचा पत्रावळीत वाढायचे

करायचा देशोद्धार संत परंपरा जपायची

मायभुमी सर्वसुखी अन् संप्पन्नही करायची

सत्य मेव जयते म्हनतं भारतालाचं

जगाचं ह्रदय करायचं

कारण मला प्रिय आहे माझा स्वतंत्र भारत देश

(-स्वाती भास्कर बंगाळे ) 

 *******************************

▪️मी माझी उमलती स्वप्न 

कोंडून डांबून ठेवते

मनाच्या अंधार कोठडीत

आगीच्या पोटात शिरून

काळजावर दगडही ठेवते

पण कधी कधी पंख छाटलेल्या

पक्ष्यासारखी स्वप्न तडफडतात 

धुमाकूळ घालतात धडपडतात

शब्दाच्या खिडकीतून डोकावतात

वास्तवात साकार होण्यासाठी 

बेभान अश्वासारखी मर्यादेचं कुंपन

तोडून सुसाट सुटतात

तुफान होवून झेपावतात

मग काय………………….

टिपूर चांदन कुशीत घेवून  

गहीवरणारी रात्र सुद्धा प्रेरणा देते

सुर्याला गवसनी घालण्याची

 (- स्वाती भास्कर बंगाळे  ) 

**********************

▪️पाय घसरला तिचा 

काळ्या लंगड्या रातीचा 

वाट चुकला तो वारा 

वेडा निधड्या छातीचा

चुक आभाळाने केली 

दिवा जळतो वातीचा 

अंग झोडतो पाऊस

 वास सुटला मातीचा

कीड बुडाला लागली 

वारं तलवारीच्या पातीचा

वाघ भुंकत निघाला 

रोग लागला साथीचा

ऊन उंडगे उनाड 

त्याचा वाढला धगाटा 

पाखरांच्या प्रणयाचा 

झाला रानात बोभाटा 

शिवाराच्या काळजात 

खोल घुसलाय काटा

 पिसाळल्या वादळाने

 दिला जोराचा झपाटा

(- स्वाती भास्कर बंगाळे  ) 

*******************       

 भावांनो कसली आहे मर्दाकविता  

बुरसाटलेल्या विचारांची 

कीड मेंदूत पडलेली 

भकास घमंडी तोंडातली

त्यांची जीभ असते सडलेली

वेदनेच्या वादळात तळपते 

मी कळी एकटी पडलेली 

नाती तुटली मडकी फुटली

प्रेतांना पाणी पाजणारी

माणसं संपली प्रेमळ हळवी

खेळकर हसरी लाजणारी

भावनाहीन थडगी फिरतात बाजारात 

क्रूर विकृत होत चालली 

पैशाने माजलेली जात

गुरफटून गेली भावंड 

पुरती वासनेच्या वादळात 

रोज उखळात खूपसून मुसळ

उपसून काढतात पिलावळ

माणुसकीचा शब्द बोलायला

घाणीतल्या तोंडात नाही बळ

निषेध योनी भुक्यांचा

जत्था निर्दयी मुक्यांचा

मुळीच माहीत नाही त्यांना

बहिणीशी कसं काय बोलायचं

काळीज व्यथांनी पछाडलेलं 

तिनं कोणाजवळ खोलायचं

अन्यायाच्या वरवंट्याखाली

अस्तित्व राखीचं ठेचलेलं

परकेपणाच्या पाषाणाखाली

आयुष्य व्यथांनी जाचलेलं

कारण नसताना आंडळतात

जळतात द्वेषाने बुजगावणी

माणुसकीला काळीमा फासण्यात नगी

(- स्वाती भास्कर बंगाळे  ) 

*******************

▪️आभाळातून विहार करतो 

ढगांचा पिंजला कापूस

त्यात पिकाया घातला गोडसर 

सूर्य भासतो आंबा हापूस 

सप्तरंगी धनुष्य घ्यावा 

सूर्याचे ते बिंब टिपावे

अलगद झेलून फुलासारखे

हातावरती उचलून घ्यावे

पिळून घ्यावा रस ओठात गुलाबी

गालातच हसतो देखणा गुलाब

गुलाल उधळीत येतो मी जातो

पाहून भुलले असा रुबाब 

सोलून त्याची साल केसरी

शिवून घ्यावा ड्रेस नवा 

दिसेल मग मी फुलासारखी 

सर्वत्र होईल माझीच हवा 

सर्वांगावर सूर्य नेसुनी

चंद्र नी तारे माळावे

 नैराश्याच्या अंधाराने

 मला भेटणे टाळावे 

झुरते रे मी आतुरतेने वाट पाहते

 आनंद द्यायला येशील का 

मनात कोमल मोहरते मी 

तुझा रंग मला तू देशील का

प्रेमाने घेईन कुशीत मी 

गालावर चुंबन देशील का 

मज अंधाराची भीती वाटते

प्रकाश उधळीत येशील का

रांगत येतो सूर्य रोज तो 

म्हणतो उठ बघ सकाळ झाली

प्रसन्न कोवळ्या उन्हात सृष्टी

 आनंदाच्या डोहातच न्हाली 

उन्हात नहाते सृष्टी सारी

डोंगर आणि दरी 

नभात गोंडस हसतो

रसरणारा सूर्य केसरी

(- स्वाती भास्कर बंगाळे ) 

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या