
🔴 येळवस अमावास्ये निमित्त सीमावर्ती भागात शेत शिवारे गजबजली.
◼️वांग्याची भाजी, भाकर (रोडगा) लक्ष्मीला अर्पण करण्याची परंपरा.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी
देगलूर, ता. ३०: मराठवाडा सीमावर्ती भागासह तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या काही भागात रब्बी हंगामाच्या पेरणी नंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला “येळवस सण” मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. *समुद्राला जशी पाण्याची भरती येते, तशी भरती प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात माणसांची येते. येळवस अमावस्येला शेताला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या दिवशी शेतकरी नवे कपडे परिधान करीत असतात. शेकडो वर्षांची परंपरा असलेला एक सण म्हणजेच येळवस. अर्थात याला वेळ अमावस्या असे म्हणण्याची प्रथा आहे.
वेळ अमावस्येच्या दिवशी प्रत्येक शेतकरी शेतात ज्वारीचे पीक असलेल्या कडब्याच्या पेंडीने खोपा करतात. त्यामध्ये पाच पांडव बसविले जातात. शेतकऱ्याच्या वतीने मनोभावे लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मीला नव्या कापडाने ओटी भरून नैवेद्य दाखवला जातो. भज्जी, आंबिल, हे खास आकर्षण असते.
◼️वेळ अमावस्या येण्याच्या चार दिवस अगोदर साधनांची जमवाजमव सुरू केली जाते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग, आवऱ्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा हा सगळा रानमेवा एकत्र केला जातो. पहाटे घराघरांत सूर्योदया पूर्वीच चूली पेटवून स्वयंपाक बनविला जातो. बेसन पिठात कालवून चिंच आणि आंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात रानमेवा उकडला जातो. ही शिजवलेली भाजी म्हणजेच भज्जी होय. या भज्जीची चव एकदम चविष्ट असते, तर त्यात भर म्हणजे हिरवी चिंच असते. तसेच चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात आंबवून जीरा फोडणी दिलेले हे पेय म्हणजेच आंबिल होय. आंबिल जास्त प्राशन केले तर त्याला कुंभकर्णासारखी झोप त्यादिवशी लागत असते. सायंकाळी खोपेतील नैवेद्य एका दुरडीत ठेवून शेतकरी गावातील मंदिराचे दर्शन घेऊन घरी जाण्याची परंपरा आजही पहावयास मिळते. शेतकरी हा सण शेतात साजरा केल्यानंतर दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या खंडोबा यात्रेला रवाना होण्याच्या शिरस्ता आजही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात बघायला मिळतो.
शेतात पूजन करतेवेळी परंपरा म्हणून खोपीला पाच फेऱ्या मारल्या जातात. यावेळी नैवेद्य चारी दिशेला फेकले जाते. वांग्याची भाजी आणि भाकर (रोडगा) लक्ष्मीला अर्पण करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. खोपी जवळ शेणाच्या गौऱ्यांवर मातीच्या मडक्यात दूध तापविले जाते. तापवलेते दूध कोणत्या दिशेला पडते, यावर कोणते धन धान्य मोठ्या प्रमाणात पिकते हे ओळखण्याची प्रथा सुद्धा आहे.
वेळ अमावस्येच्या दिवशी सकाळीच आबाल वृद्धांसह बाळ गोपाळ बैलगाडीत बसून शेतात जातात. आंबिल घेऊन येणारा शेतकरी कोणास न बोलता, मागे फिरून न बघता, गावातील मूख्य देवस्थानाचे दर्शन केल्यानंतर शेताकडे जातो. लक्ष्मीपूजनानंतर सुग्रास भोजनाचा भोज चढून मोठी पंगत बसते.
एका शेतातून दुसऱ्याच्या शेतात जाऊन तेथील आंबित व भाजीचा आस्वाद घेण्याचा आग्रह शेतकरी एकमेकांना करतात. शेतात बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, जवळचे गावा गावातील मंडळी या निमित्ताने एकत्रित जेवण करतात. गप्पा गोष्टी करण्याची परंपरा या निमित्ताने आजही जोपासली आहे.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















