20.2 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात “इंद्रधनुष्य युवक महोत्सव”

🔴 तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात ‘इंद्रधनुष्य युवक महोत्सव. 

♦️युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी युवक महोत्सव प्रेरणादायी – रानकवी जगदीप वनशिव. 

पूणे प्रतिनिधी : जगदीप वनशिव 

तळेगाव ढमढेरे, दि. २६ महाविद्यालयीन जीवनातच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी युवक महोत्सव प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध रानकवी जगदीप वनशिव यांनी केले. 

तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त आज पासून सांस्कृतिक विभागाच्या वतीने इंद्रधनुष्य या सात दिवशीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रानकवी वनशिव बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळ व पुण्यातील विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमढेरे समारंभाच्या अध्यक्ष स्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख व महोत्सवाचे समन्वयक डॉ. दत्तात्रय वाबळे आदी याप्रसंगी उपस्थित होते. श्री वनशिव पुढे म्हणाले की, सध्याचे वर्तमान अस्वस्थ अवस्थेतून जात आहे. आजचा महाविद्यालयीन युवक अनेक समस्यांनी आणि नैराश्याने ग्रस्त आहे. अशा अवस्थेत युवकांना प्रेरणा देऊन त्यांची वैचारिक जडणघडण करण्यासाठी इंद्रधनुष्य सारखे सांस्कृतिक उपक्रम निश्चित कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार त्यांनी काढले. युवकांची नवी पिढी खूप हुशार असून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. या युवा शक्तीचा याचा योग्य वापर झाल्यास निश्चित समाजाचे भवितव्य उज्वल असल्याचेही रानकवी 

वनशिव म्हणाले. मराठी भाषा ही समृद्ध आणि सांस्कृतिक वारश्याने नटलेली आहे. अशा आमच्या वैभवशाली मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेशबापू ढमढेरे यांनी महाविद्यालया च्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा विस्तृत आढावा घेतला. शिरूर सारख्या एके काळी ग्रामीण व दुष्काळी असलेल्या भागातील शेतकरी, कष्टकरी, वंचित, बहुजन आणि कामगार वर्गातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने या परिसरामध्ये महाविद्यालयाची स्थापना केली. बघता बघता पंचवीस वर्षांच्या वाटचाली मध्ये हजारो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले. याचा शिक्षण प्रसारक मंडळ परिवारास सार्थ अभिमान वाटत असल्याचे महेश बापू म्हणाले. भविष्यातही संस्थेच्या अनेक योजना असून उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रम साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात यशस्वी पणे राबवण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादनही महेशबापू ढमढेरे यांनी याप्रसंगी केले. आजच्या अस्वस्थ आणि गतिमान युगा मध्ये युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपले आई-वडील आणि गुरुजनांचा सन्मान राखावा, जीवनात शिस्त अंगी बनवावी अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. इंद्रधनुष्य युवक महोत्सवाच्या माध्यमातून युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य असल्याचे कौतुक ही त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इंद्रधनुष्य युवक महोत्सव ज्यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे अशा डॉ. पराग चौधरी यांनीही याप्रसंगी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. इंद्रधनुष्य सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना हक्काचे व्यासपीठ महाविद्यालयाने उपलब्ध करून दिले आहे. जास्तीत जास्त युवकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही प्राचार्य चौधरी यांनी याप्रसंगी केले. सांस्कृतिक महोत्सवाच्या धर्तीवरच महाविद्यालय लवकरच क्रीडा महोत्सव आयोजित करणार असल्याचे सूतोवाच यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

दि. २६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात सुरू झालेल्या प्रस्तुत युवक महोत्सवामध्ये रांगोळी, फोटोग्राफी, भारतीय वाद्यवादन, नृत्य, नकला, वकृत्व, निबंध, मेहंदी, गीतगायन, रंगकाम, वादविवाद आणि प्रश्न मंजुषा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत . जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपल्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठावर आणण्याचे आवाहन महेशबापू ढमढेरे व प्राचार्य डॉ.पराग चौधरी यांनी केले आहे.  

उद्घाटन समारंभाचे स्वागत व मान्यवरांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख दत्तात्रय वाबळे यांनी करून दिला. डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी सूत्र संचालन केले प्रा डॉ. संदीप सांगळे हे उपस्थित होते तर डॉ. पद्माकर गोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या