*मराठवाडा जनविकास परिषद ठाणे अंतर्गत गौरवशाली पुरस्कार*
मराठवाडा जणविकास परिषद ठाणे यांच्या वतीने विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान. आष्टी तालुक्याचे सुपूत्र मराठवाड्यासह देशात नावलौकिक केलेले सोमनाथ वाळके यांना मराठवाडा रत्न, पुरस्काराने सन्मानित.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गौरवशाली कार्य संबोधले गेले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब, व कृषिमंत्री मा.धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल ठाणे येथे भव्य सोहळ्यामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल, मराठवाडा रत्न सन्मानाने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, ठाण्याचे मा.आमदार संजय केळकर, ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील एका सर्व सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेले सोमनाथ वाळके हे आज भारत देशातील नामवंत शिक्षकांमधून गणले जातात.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडवून विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रांती घडवून यावी म्हणून अहोरात्र ते परिश्रम घेत आहेत. कॉम्प्युटर क्षेत्रातील तज्ञ असणारे सोमनाथ वाळके हे संगीत, वाद्य आणि विविध विषयावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक विकास आणि मूल समजून घेतांना, या विषयावर कार्यशाळा घेत असतात. महाराष्ट्रातील नामवंत विद्यालय मधून त्यांना कार्यशाळा घेण्यासाठी विशेष आग्रह केला जातो. त्यांचे काही विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून कोट्यावधी रुपयांच्या पॅकेजचा त्यांना लाभ होत आहे ही त्यांच्या शैक्षणिक विद्वत्तेची खरी चमक आहे. आज पर्यंत त्यांना मराठवाडा समता परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा, राज्य शिक्षक पुरस्कार, केंद्र सरकारचा आयसीटी अवॉर्ड व २०२२ मधील देशातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च असणारा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रदान करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यभरातील जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हा व राज्यस्तरीय असे शंभर पेक्षा जास्त पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
अहो रात्र परिश्रम करून राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये महत्त्वाचे बदल व विद्यार्थी जीवनामध्ये त्यापासून मिळणारे फायदे यामध्ये श्री सोमनाथ वाळके नेहमीच सतर्क राहुन अभ्यास करत असतात. याचीच दखल घेऊन आज त्यांना आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील मुले आत्ता राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. श्री सोमनाथ वाळके त्यांच्या कार्य शैलीचा उपयोग नेहमीच राज्याला होत आहे आणि यापुढेही होत राहील असे गौरवोद्गार सन्माननीय माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी काढले. याप्रसंगी नामदार धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा वाळके सरांचे विशेष कौतुक केले व पुढील कार्यासाठी सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.















