
🔴 रुग्ण सेवा मंडळाकडून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार.
♦️तब्बल ४२० यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबदल दि.२० सप्टेंबरला सत्कार सोहळा.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी : (९९२३०७२२४२)
देगलूर शहर व सीमावर्ती भागातील गोरगरीब रुग्णांना नाम मात्र दरात वैद्यकीय सेवा देण्याचे पवित्र कार्य रुग्ण सेवा मंडळ १९७७ पासून करीत आहे. महाराष्ट्र शासना द्वारे उपजिल्हा रुग्णालय आणि स्वयंसेवी स्वरूपात कार्य करणारे रुग्ण सेवा मंडळ या दोन्ही संस्थाद्वारे या भागातील गोर गरीब रुग्णाना विविध आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे मागील पाच महिन्यांच्या कालावधीत विविध प्रकारच्या तब्बल ४२० शस्त्रक्रिया मोफत यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय हे गरीब रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. आरोग्यविषयक निकषानुसारही उपजिल्हा रुग्णालय, देगलूर हे सध्या जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर पोहोचले असुन देगलूरकरासाठी ही आभिमानाची बाब आहे.
मागील पाच महिन्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया १९५, सिझेरियन शस्त्रक्रिया ३७, डोळ्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया १३७, हायड्रोसिल शस्त्रक्रिया १४, हर्निया शस्त्रक्रिया १४, इतर गाठीच्या शस्त्रक्रिया २२, अपेंडिक्स शस्त्रक्रिया १४, छाती वरची गाठ ३ असे एकूण ४२० शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. यासह सिटी स्कॅन २९४९ व वर्षभरात एकूण ७४८८, गरोदर मातेच्या सोनोग्राफी २१६, नैसर्गिक प्रसूती ४१५ त्यामध्ये जुळे दोन प्रसूती, बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) ५३८०६ इत्यादी रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असुन वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. नरेश देवणीकर यांनी पदभार स्वीकारल्या पासून रुग्णालयात विविध आरोग्य सेवा व शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे केल्या जात आहेत. समर्पित भावनेने रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी वर्गाचा सत्कार करणे हे एक कर्तव्य आहे. त्या निमित्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवणीकर व सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रुग्णसेवा मंडळाच्या वतीने दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. प्रस्तुत सत्कार कार्यक्रमास देगलूर शहर व परिसरातील रुग्ण, रुग्णांची नातेवाईक, लोक प्रतिनिधी, पत्रकार, प्राध्यापक, प्रतिष्ठित नागरिक व इतरांनी उपस्थित रहावे असे आवाहन रुग्ण सेवा मंडळ वतीने करण्यात आले आहे.















